Sunday, June 06, 2010

पाउस...

kjt2_jpgकाल नेहमीप्रमाणे कामाला निघालो होतो. पवईजवळ आलो तेव्हा जरा रस्ता ओला दिसला आणि अंगावर दोन थेंब पडल्यासारखं वाटलं. आभाळ तसं मोकळं होतं त्यामुळे पाउस पडेल असं काही वाटलं नाही. पण एक सर नक्कीच पडून गेली होती.

पावसाळा हे एक अनुभव मोजण्याचं साधन आहे असं म्हणतात. जितके पावसाळे, तितकी वर्षे, तितका अनुभव गाठीशी असं हे ढोबळ माप. आजच्या डिजिटल काळात हे मापटं तसं जुनाटच म्हणायचं, तरीपण जरा मागं डोकावलं तर जाणवतं की मागे एक पावसाच्या आठवणींचा वाटा आपण या मापात सहज मोजू शकतो. खासकरून पहिल्या पावसाच्या...

"येरे येरे पावसा,
तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा,
पाउस आला मोठ्ठा!"
लहानपणी पाउस म्हणजे कित्ती मज्जा होती. पाउस जवळ आला की सगळ्यात आधी रेनकोट आणि गमबूट आणले जायचे. त्यावेळेला काळा रंग म्हणजे मुलांचा आणि लाल-गुलाबी म्हणजे मुलींचा हे सोप्पं डिवीजन असायचं. आजच्या बेन-१०, शिनचान चे रंग पाहिल्याचे नाही आठवत. खरेदी एकदम सोपी होती. जायचं, मापाचा रेनकोट आणि बूट घ्यायचा आणि यायचं.
नवीन बूट हमखास लागायचे, एकदा ते सरावले, की मग ते आवडायचे. कुठे छपरावरून पाणी ओघळत असलं की मी ते बूटात भरून घ्यायचो. चालताना छपछप आवाज यायचा! दिवसभर पाय ओले राहीले म्हणजे घरी येईपर्यंत ते मस्त गोरे गोरे होत आणि सुरकुतत :)

तेव्हा माझी शाळा एक तास लवकर सुटायची. मी भावाची शाळा सुटेपर्यंत मोकळा असायचो. पावसाळ्यात हा मोकळा वेळ म्हणजे पर्वणी असायची. हा सगळा वेळ मी शाळेच्या मैदानात काढायचो. आमच्या शाळेचं मैदान पावसात भरायचं. एका कोपर्‍यातल्या नाल्यातून ते पाणी बाहेर जायचं. कितीही पाणी गेलं तरी मैदान मात्र भरलेलं रहायचं. अशात एखादी कागदाची बोट कुठेही टाकली तरी तासाभरात ती हमखास या कोपर्‍यात यायची. या खेळात मग तास पटकन निघून जायचा.

नंतर नंतर रेनकोट वापरायला कंटाळा येउ लागला. दुमडून ठेवण्याजोगी छत्री हवीहवीशी वाटायला लागली. तिचा कामचलाउ क्रिकेट बॅट म्हणून वापर करता येई हा जमेचा गुण!
अभ्यास, शाळा आणि क्लासेसमध्ये दहावी निघून गेली. हे वयच असं होतं की छत्री पावसात भिजण्यासाठी वापरावी वाटू लागते, एकट्याने नव्हे! पावसाची गाणी आणि पावसात भिजणं आवडायला लागतं परत. "गारवा" तेव्हाच आला होता. तसंच, सोनाली बेंद्रेचं "सावन बरसे" हे माझं सर्वात आवडतं गाणं होतं तेव्हा. त्या गाण्यातली ती भेटीची ओलसर उत्कंठा अनुभवल्याशिवाय पावसाळा पाहिला असं म्हणणंच शक्य नाही!

एक हमखास पिकनीक व्हायची - टिपिकल जागा - माथेरान, माळशेज नाहितर पळसदरी. एखादा धबधबा शोधायचा, त्यात चिंब भिजायचं, कुणालातरी धप्पकन पडताना बघायचं,  वाफाळलेला चहा-भजी खाउन आणि चिंब भिजून घरी परतायचं. खर्च नेमका, आणि तोपण कॉंट्री काढून केलेला.

आता पावसाळा पहिल्यासारखा ओलसर वाटत नाहिये असं वाटतंय. का बरं असं असावं? असं वाटतं की तेव्हाचे पावसाळे वेगळे होते. असे अनेक दिवस होते जेव्हा अगदी कसली चिंता नाही, कामाची कटकट नाही, कामावर जाताना कपडे, लॅपटॉप भिजण्याची.

एखादा दिवस सुट्टी काढेन म्हणतो. सरळ निघायचं, जवळच कुठेतरी जायचं सगळं मागे ठेवून, मस्त भटकायचं, वाफाळता चहा, गरम भजी खाउन परतायचं, आणि एक दिवस फक्त खिडकीतून पावसाच्या सरी बघत  गाण्याच्या सुरांत बुडून काढायचं असं वाटतंय. बघुया जमतंय का या पावसाळ्यात!

तुमचा काय प्लॅन आहे?