Wednesday, March 30, 2011

पुणेरी पाटीची दुसरी बाजू...

एका मिसळवर दुसरी मोफ़त देणारी ही पुण्यातली पाटी टिव्हीवर दाखवली गेली आणि बेचैन झालो. मन मानेना. इतक्या प्रेमाने लिहिलेली ही बहुधा एकमेव पुणेरी पाटी असावी.

बिछान्यावर टेकायला गेलो तरी पाटी काही डोक्यातना जाईना. शहानिशा करणं जरुरी भासू लागलं. आपण नोंदणी केली नाही म्हणून काय झालं, उगाच कुणाची फ़सवणूक नकॊ व्ह्यायला, काय?
सकाळी उठून कामावर न जाता घटनास्थळी गेलो आणि मग खरीखुरी बातमी हाती लागली. आनंदाच्य भरात सगळे समोरुन पाटी पाहून गेले. पाटीमागील पाटी कुणीच पाहिली नव्हती. तुमच्यासाठी पाटीमागील मजकूर खाली देत आहे.

सूचना:
- नोंदणी कूपन हरवल्यास आम्ही जबाबदार नाही. अशा स्थितीत मिसळ मिळणार नाही
- फाटक्या, ओलेत्या कूपनवर मिसळ मिळणार नाही
- एका मिसळवर एकच मिसळ मोफत मिळेल. मोफत मिळालेल्या मिसळवर मोफत मिसळ मागून स्वत:ची अक्कल दाखवू नये
- अतिरिक्त पाव मोफत मिळणार नाही
- एक मिसळ एकालाच खाता येईल. ही अट फुकटच्या मिसळवर पण लागू राहील
- कामशिवाय बसता येणार नाही. मिसळ कमीतकमी वेळेत खाउन इतरांना संधी द्या
- मोफत मिसळ फक्त ३१ मार्चलाच मिळेल तसेच हॉटेलची वेळ संपल्यावर ऑफर संपेल
- इतरांनी हळू मिसळ खाउन वेळ दवडल्यास आम्ही जबाबदार नाही
- पाकिस्तान जिंकल्यास पैसे परत मिळणार नाहीत

टिव्हीवरील अर्धवट बातम्यांवर विश्वास ठेवू नये हेच खरं असं म्हणत कामाला लागलो.

--------------------------------------------------------------------------------------------
टिपेची पाटी:
- वरील पोस्त काल्पनिक आहे. उगाच खरी मानू नये