Saturday, October 03, 2009

Back to school...

बांद्र्याला कामासाठी गेलो होतो. मग अचानक विचार केला की जरा शाळा पाहून यावी. शाळेबाहेर थांबलो आणि आत एक चक्कर मारायची तीव्र इच्छा झाली. आत जावं की नाही, कोणी ओळखीचं भेटेल काय, ओळखेल काय - मनात चलबिचल झाली पण शेवटी आत गेलो...तब्बल १७ वर्षानंतर!

"teacher's room कुठे आहे?" आत शिरताना एका शिपायाला मी विचारलं,
"काय पाहिजे?". मला शंकेने न्याहाळत त्याने विचारलं, "काय काम आहे?".
पण जेव्हा मी सांगितलं की मी शाळेचा विद्यार्थी होतो, तेव्हा त्याचा सूर एकदम पालटला. मला उत्साहाने त्याने रस्ता दाखवला.

शाळा आता खूप वाढलेली होती. आधी मोठ्या दोन इमारती होत्या आणि त्यातल्या एकीला लागून एक बैठी शाळा होती. या बैठ्या शाळेतच आमचे वर्ग होते. ती तोडून मुख्य दोन्ही इमारतींना जोडणारी एक तिसरी इमारत आता आली होती. शाळेत junior college आणि मुलींसाठी वसतिगृह आले होते. लहानपणी मोठ्ठं वाटणारं मैदान आता छोटं वाटत होतं.
Passage मधून जाताना time machine मध्ये चालत असल्याचा भास होत होता. Teacher's room जवळ पोहोचलो आणि माझ्या एका class teacher चे नाव head master पाटीखाली पाहिलं. "Madam आहेत का?" मी तिथे चौकशी केली. तिथल्या शिपायाने माझं नाव आणि काम विचारलं. मी घाग म्हणाल्यावर त्याने पटकन "किरण घाग?" असा प्रश्न केला. मी चकीत झालो. मनातली एक जुनी आठवणींची cassatte लोड झाली. मला विचारणारे प्रकाश मामा, समोर बसलेल्या पुळेकरबाई, सगळं पटकन आठवलं.
मला बसायला खुर्ची आणि प्यायला पाणी मिळालं आणि सगळी विचारपूस सुरु झाली. ओळखीचे बरेच जण retired झाले होते. परिक्षा सुरु होती म्हणून सगळे शिक्षक वर्गावर होते.  मग मी वर्गावर जायचं ठरवलं.
सोमणबाई, वालावलकरबाई आणि पावसकरसर भेटले. आपला विद्यार्थी इतक्या वर्षांनंतर आल्याचा आनंद मला स्पष्ट दिसत होता आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना माझं मन तृप्त होत होतं.

बोलण्यात मला शिक्षकांच्या आणि शाळेच्या काही व्यथा जाणवल्या. शि़क्षण महाग होत चाललय, मराठी तुकड्या कमी होत आहेत, मराठी माध्यमातून शिकणं स्पर्धात्मक राहिलं नाही असा गृह बळावतोय, मुलांचा उत्साह कमी होत चाललयं, या त्यापैकी काही. हळुहळू मला जाणवलं की शाळेची इमारतच फ़क्त बदलली होती. पण शाळेतलं शिक्षण अगदी तसच होतं. आमच्या वेळेला भिंतीवर असणारे तक्ते, frame केलेले models, सुंदर अक्षरांवर जोर देणारे, जिव्हाळ्याचे शिक्षक अजून तसेच होते. 

- एका वर्गात २ मुलं अशीच बसली होती. मग कळलं की त्यांचा आज पेपर नव्हता, पण ती चुकून आली होती. मग एकटं परत पाठवण्यापेक्षा त्यांना बसवून ठेवलं होतं.
- वालावलकरबाईंशी बोलताना एक मुलगा करंगळी वर करुन आला - "बाई सूसू!" त्याला पाठवलं मग एकामागून एक ४-५ जणं आली. अशी संसर्गजन्य सू आम्हालापण व्हायची :)

बाहेर पडताना बहुतेक पेपर सुटला होता. मुलं रांगेत बाहेर पडत होती. त्या रांगेतून मार्ग काढत मी पण बाहेर निघालो. घरी येउन २ दिवस झाले, मन मात्र अजून एका छोट्या बाकावर बसलय.