Sunday, March 21, 2010

पुणेरी आय पी एल पाट्या!

सामने रात्री असतात म्हणून की काय, आय पी एल मध्ये पुण्याचा संघ येतोय (एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात पुणेकर पुढे नाहीत याचं कारण पुणेकरांची दुपारी १-४ ची झोप हे माझं वैयक्तीक मत आहे!).

आता ऎतिहासिक पुणेरी बाण्याचा समावेश क्रिकेटमध्ये कसा होणार याकडे लक्ष लागून राहील. पुणेकरांचे पाट्याप्रेम जगप्रसिद्ध आहेच. पाट्या क्रिकेटला काही नवीन नाहीत. तर आता हा खेळ पुण्यात आल्यावर मैदानात कोणत्या नवीन पाट्या लागतील?

- खेळ चालू असल्याशिवाय बसू नये
- उगाच दुस~या टीम ला प्रोत्साहन देऊ नये
- हे क्रिकेटचे मैदान आहे, टिव्ही नाही. चीअर लिडर्स कडे डोळे फाडून बघू नये
- (खेळाडूंनी) पंचांबरोबर हुज्जत घालू नये.
- स्कोअर काय झाला याची चौकशी इकडे तिकडे करु नये. मोठ्या स्कोअरबोर्डचा वापर करावा
- तिकीट घेऊन सामना बघावा. घेण्याचे पैसे नसल्यास घरी बसून टिव्ही पहावा. उगाच झाडावर गर्दी करु नये.
- पाण्याच्या बाटल्या मैदानावर फ़ेकू नये, खेळाडूंना आम्ही पैसे देउन पेप्सी पुरवतो.
- पाउस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत.

टिप: नियमांचे उल्लंघन करु नये. तुमच्यावर लक्ष आहे याची नोंद घ्यावी. सापडल्यास किमान शब्दात कमाल अपमान होईल वा मार खाण्याची पाळी येईल.

- हुकुमावरून

(तुमच्या जवळील मैदानात अजून पाट्या सापडल्यास कळवणे, इथे नोंद करण्यात येईल!) :)