Saturday, October 23, 2010

"सिंहासन"च्या निमित्ताने भूतकाळात डोकावताना...

नुकतच कुणीतरी सुचवलं की "सिंहासन" बघ. जुना आणि मस्त पिक्चर आहे म्हणून. आता तो कुठून मिळवायचा हा प्रश्न गूगलबाबांनी चुटकीसरशी सोडवला. TPB वर एकजण चक्क seed करत होतं. वेळ न दवडता download केला. १९८० म्हणजे माझं जन्मवर्ष. त्यावेळचं आता काही फारसं आठवत नाही त्यामुळे त्यावेळचा चित्रपट बघायची उत्सुकता खुप होती. त्यात राजकारण म्हणजे अजुनच.

चित्रपट उत्तमच, "जाने भी दो यारो" च्या पठडीतला. अनेक दिग्गजांनी भरलेला. राजकारणाचं अप्रतिम चित्रण आणि सुरेख संवाद. राजकारण फारसं बदललेलं नाही (अफरातफरीचे आकडे सोडले तर). चित्रपट जसाच्या तसा आज पुन्हा आणता येउ शकतो.

पण त्या काळचं एक प्रतिबिंब किंवा documentary evidance म्हणून पाहिला तर जुन्या गोष्टी बघायला मिळतात. त्यापैकी काही खाली देत आहे...

गांधीटोपी आणि शबनम घेऊन फिरणारी लोकं

लोलकाची घडयाळं आणि त्यातल्या काचेवर नक्षीकाम,
सलूनमधली पाण्याची फवारा करण्याची बाटली (तिच्या नळीला असलेल्या गोफात बोट घालून पाणी फवारले जायचे)

जुने काळे फोन. प्रत्येक मुख्य पात्र एकदा तरी फोनवर बोलतान दिसतं यात. (आजोबा त्यावेळच्या BSNL मध्ये कामाला होते आणि आमच्याच इमारतीत त्यांचं ऑफीस त्यामुळे असे फोन म्हणजे आमची खेळणी होती!)

खिळे लावून छापलेले पेपर. शब्दांमधली जुळणीची फट सहज दिसते

टेबलावर ठेवलेली मोठी काच, त्याखाली कागद, टेबलावर फायली आणि काचेचे पेपरवेट्स

भिंतीवरून केलेली लाकडी पट्टीवरची वायरींग आणि पंख्यासाठीचे मोठे रेग्युलेटर्स

अल्युमिनीयमचे भांड्यांचे स्टॅंड्स आणि डालड्याचे "रीयुजेबल" डब्बे. डालडा संपला की त्याची जागा डाळी घ्यायच्या.

नक्की कळत नाहीये, पण मला वाटतं हा वरळी सी फेस आणि मागे सी रॉक हॉटेल दिसतंय

विधान भवन, इंडियन एक्स्प्रेस टॉवर

पुठ्ठ्याचे कॅलेंडर, त्यांच्या खाली प्रत्येक तारखेचा एक कागद. तारीख सहसा मराठी, इंग्रजी आणि गुजरातीत, तिथीविशेषासकट. दिवस उलटला की आदल्या दिवसाचा कागद फाडायचा. पुठ्ठ्यावर एखादा देवाचा,मुलाचा किंवा मस्त बाईचा फोटो!
न ओळखता येणारे मुंबईचे रस्ते


ए-एम ट्रांझिस्टर्स/रेडियो/टेप रेकॉर्डर

बेल-बॉटम पॅंट्स, मोठ्या छापाचे कपडे, लांब कल्ले आणि "हॅंडलबार मिशा"
फियाट

मॅटॅडोर वॅन