Sunday, February 07, 2010

नटरंग - सुरेख!!

नटरंग येऊन बरेच दिवस झाले. रिलीज व्हायच्या आधी Zee वर त्याचं मेकिंग पाहिलं होतं. पहावं असं तेव्हाच वाटलं होतं. पण राहून गेलं. आज मोकळा शनिवार मिळाला तेव्हा पाहिला. खूप आवडला.

नटरंगमध्ये तमाशा आहे हे तर माहीत होतं. टिपिकल तमाशाप्रधान मसाला पाहण्यात मला काही, किंबहुना काहीच इंटरेस्ट नव्हता. मात्र मेकिंग पाहताना थोडी उत्सुकता निर्माण झाली होती. अजय-अतुलचं संगीत हे त्याचं कारण होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या दोघांचं संगीत synthesizer मागे टाकून आलंय. त्यांच्या गाण्यात वाद्यांची आणि शैलीची मस्त विविधता आहे आणि सुंदर आवाज देखील. त्यांचा एकूणच दर्जा हिंदीतही वरचढ ठरू शकेल यात मला शंका नाही. नटरंग मध्ये त्याची गाणी हळुवार सुरुवात करतात आणि अचानक दणका देऊन वेग पकडतात. हे सगळं होताना आपण तमाशा पाहतोय हे जाणवतच नाही. Long term मध्ये त्यांची गाणी सणासुदीला आणि वरातीत नक्कीच "वाजत" राहतील.

नटरंग मध्ये संगिताशिवाय आवडतील असं बरंच काही आहे. चित्रपटातल्या गुणाचं वेड मला भावलं. करण्यासाठी करणारे खुप असतात आणि मन लावून करणारे खुप कमी. यातला फरक कळणारे तर याहूनही कमी. ध्येयाच्या ध्यासाने जाण्याची धडपड, हतबल करणार्‍या अडचणीत आलेलं नैराश्य आणि शेवटी मिळवलेलं यश - एकदम कनेक्ट झालं आणि चित्रपट अजूनच आवडत गेला.अतुलची मेहनत प्रशंसनीय आहेच. नैना देखील आवडली.

मराठी भाषा आणि चित्रपट घुसमटत आहेत ही आता चोथा झालेली बोंब. पण याला कारणीभूत मराठीच आहे. श्वास, वळू, टिंग्या, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हरिश्चंद्राची फॅक्टरी असे Mainstream हिंदीबरोबर स्पर्धा न करणारे, मेहनत घेऊन बनवलेले चित्रपट वरचेवर आल्यास नक्कीच बरे वाटेल. नुसता चित्रपट नाही, तर इतरही commercials आणि तांत्रिक बाबींकडे लक्ष द्यायला हवंय. साधं उदाहरण द्यायचं तर नटरंगची वेबसाइट पाहा. एक तर स्वतःची वेबसाइट नाही, त्यात अर्ध्या links चालत नाहीयेत. नटरंगची DVD पण अपेक्षित आहे. त्यात नुसता चित्रपट नकोय तर त्याचं making आणि अजून बरंच काही हवंय.

एक वेळ अशी आली होती की मराठी सिनेमा आणि तमाशा हे यशाचं समीकरण बनलं होतं. तमाशाचा आग्रह (अतिरेक) मराठी सिनेमा साठी घातक ठरला होता. तमाशाची monotony slapstick कॉमेडीने मोडली होती. आज त्याचाही अतिरेक होऊ लागलाय (सौजन्य - भरत जाधव/संजय नार्वेकर आणि कंपनी).  नटरंग मुळे पुन्हा तमाशा परत नाही आला तर बरं.