Sunday, April 18, 2010

ठाणे पासपोर्ट कार्यालयाबद्दल काही ...

गेल्या आठवडयात माझा पासपोर्ट संपत आला होता. आता सरकारी वास्तूत जावं लागणार आणि मनस्ताप अटळ. माझा जीव इथेच खालीवर होऊ लागला.
माहिती गोळा करताना कळलं की आता online अर्ज भरून appointment घ्यावी लागते. मी पण अर्ज भरला. त्यात सूचना होत्या की ठरलेल्या वेळेत न पोहोचल्यास परत नवीन appointment घ्यावी लागेल ईती. क्षणभर वाटलं की व्वाह! पण पुढे सगळा भ्रमनिरास झाला. तुमचा देखील होऊ नये म्हणून हा प्रपंच...
  • Appointment वगैरे घाला चूलीत. तुम्ही कधीही फॉर्म भरून जाउ शकता. तुम्हाला दिलेल्या appointment चं कोणालाही काहीही सोयरसुतक नाही तिकडे
  • प्रत्येक पुराव्याच्या दोन नकला काढा. मूळ प्रती सोबत ठेवा. आणि प्रत्येक नकलेवर तुमची सही करा. पासपोर्टवर VISA असल्यास त्या पानांची पण नक्कल जोडा. Online checklist मध्ये हे सगळं वाचल्याचं मला आठवत नाही.
  • गेल्यावर तुम्हाला token घेण्याच्या रांगेत उभं रहावं लागेल. आदल्या दिवशी सुट्टी असल्यास रांग मोठी असेल.
  • सरकारी कामासाठी लागलेली रांग. दलालांसाठी वेगळी दुपारची वेळ आहे. तरी रांगेत शिरणार्‍यांसाटी, त्यावरील भांडणांसाठी तयार रहा. एक आजीबाई अगदी अजिजीने सांगू लागली की ती रांगेत होती पण धक्का लागून दुसर्‍या रांगेत गेली. मग ती token घेउन सरळ "त्या" दुसर्‍या रांगेत गेली व हेच बोलू लागली!! इतर काही बायका जवळील मुलांना घेऊन सिग्नल वरील भिकार्‍यांप्रमाणे हावभाव करुन रांगेत घुसू देण्यासाठी विनवण्या करत होत्या. (सिग्नल वरील भिकार्‍यांप्रमाणेच त्या यशस्वी पण होत होत्या :)
  • token देणारा तुमचा अर्ज पाहील. महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आहेत की नाही एवढं चाळेल आणि तुम्हाला एक शिक्का आणि त्यावर क्रमांक लिहून देईल. हेच ते token.
  • आता तुम्हाला दुसरी रांग लावावी लागेल. ही रांग आहे "फाइल बनानेकी". इथे तुमच्या अर्जाला एका कागदी कव्हरमध्ये लावले जाईल आणि धाग्याची गाठ मारली जाईल. (सरकारी दस्तऎवज बांधून ठेवण्यासाठी काही अभिनव पद्धती वापरल्या जातात. त्यापैकी ही एक)
  • आत्ता तुम्ही आतल्या खिडकीवर जायला मोकळे. Token ची वाट पहा आणि सांगितलेल्या खिडकीवर जा. तुमचा अर्ज परिपूर्ण असल्यास तुम्हाला पैसे भरण्याची सूचना करण्यात येईल. नसल्यास तुम्हाला आल्यापावली परत पाठवण्यात येईल.
  • VISA असल्यास पासपोर्टवर तो रद्द केल्याचा शिक्का मारुन तुम्हाला परत करण्यात येईल. हे न विसरता करा. तसेच तुमच्या अर्जावर VISA असल्याचा एक शिक्का मारण्यात येईल.
  •  तुमच्या online अर्जाचा खरा उपयोग इथे होतो. ती माहीती इथला कारकून retrieve करेल आणि काही दुरुस्ती असल्यास करेल. नोंदी झाल्याकी पैसे घेउन पावती देण्यात येईल.
पावती हातात पडली की मोहीम फत्ते समजा (आजपुरतीतरी)!