गॅजेट्सची आवड लहानपणापासूनच. नुकतंच मी एक जीपीएस (GPS) यंत्र घेतलं. ते नीट चालण्यासाठी मोकळ्या जागेत ठेवावं लागतं. मोटरसायकलवर ते नीट बसावं म्हणून एक होल्डरपण मागवला. जीपीएस यंत्र त्या होल्डरमध्ये लावायचा आणि होल्डर समोर लावायचा, म्हणजे सिग्नल व्यवस्थित पकडतो. परवा पहिल्यांदाच मी या सगळ्याची जुळणी केली आणि कामाला निघालो.
नेहमीप्रमाणे डेस्कवर पोहोचलो, काम सुरु केलं आणि १-२ तासानंतर जाणवलं की रोजचे सोपस्कार करताना जीपीएस काढून आणायला विसरलोच की! पळत पळत खाली गेलो आणि अपेक्षेप्रमाणे फक्त होल्डर राहिला होता. जीपीएस गायब झालं होतं! चोर ना सही, चोर की लंगोटी सही या हिशोबाने मी होल्डर काढून आणला. तो काढताना मला कॊणीच हटकले नाही त्यामुळे तसंच कॊणीतरी जीपीएस नेलं असणार बिनदिक्कत.
चूक माझीच होती त्यामुळे अक्कलखाती नुकसान जमा करण्याशिवाय पर्यात नव्हता. मी मग मनाशी चरफडलो. इतरांची वस्तू कोणीतरी कसं नेउ शकतं आणि त्याचं काहीच वाटत नाही, आपण भारतीय कसे आहोत यावर संतापलो.
नुकताच एक ताजा किस्सा मनात होता. आयपॉड आणि आयपॅड माहित असेल तुम्हाला. सध्या आयपॉड-३जी मिळतो आणि ४जी हा अजून विक्रीसाठी खुला नाही. साहजिकच जगभरात आयपॉड ४ बद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आणि त्यात नवीन काय असेल याचे कयास बांधले जात आहेत. नेहमीप्रमाणे ऍपलकडून याबाबतीत गुप्तता पाळली जात आहे.
तर या ऍपलचा एक कर्मचारी पॉवेल, अमेरिकेत एका बार मध्ये गेला. त्याच्याकडे नवीन आयपॉड ४ होता. तो या आयपॉडच्या प्रोग्रामिंग टोळीत असल्याने ते शक्य झालं होतं. तिथून निघताना पठ्ठ्या आयपॉड विसरला आणि तो एकाला मिळाला. फोनमधील फेसबूक पेजवरून त्याला पॉवेलची माहिती मिळाली. त्याने ऍपलला फोन केला. प्रथम ऍपलने नाकारलं. इज्जत का सवाल होता ना! इतकं होईपर्यंत पॉवेलने तो फोन रिमोट प्रोग्रामरित्या नाकाम केला.
ही खबर gizmodo.com ला लागली आणि त्यांनी तो फोन ५००० डॉलर्सला विकत घेतला. आयपॉड ४ ची सगळ्यात पहिली अंदर की बात इंटरनेट वर आली! आता ऍपल जागं झालं आणि सगळ्या प्रकरणावर कायदेशीर उहापोह सुरु झाला.
या सगळ्यात सांगण्याचा मुद्दा हा की यावरील एक मत मी वाचले. त्यात असं म्हटलं होतं की ज्याला तो आयपॉड मिळाला त्याला तो कायदेशीररित्या विकता येत नाही. तो लगेच पोलिसांकडे द्यावा लागतो अथवा मालकाकडे. जर दोघांनीही तो घेण्यास नकार दिला तर तो स्वतःकडे ठेवता येतो. यापैकी काही न करता जर तो स्वतःकडे ठेवला तर तो चोरी या प्रकारात मोडू शकतो.
हे वाचन ताजं होतं आणि तेव्हाच माझं जीपीएस मी विसरलो होतो. ते परत मिळणार नाही हे गॄहीत धरुनच मी मनाशी
- मला मूर्ख
- ते घेणार्याला चोर आणि
- वॉचमनला कामचोर
संध्याकाळी घरी जाताना मी सहजच पार्किंग सिक्युरिटीकडे चौकशी केली आणि आश्चर्य! त्यानी ते जीपीएस काढून ठेवलं होतं!!!